बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कर्नाटक दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. यावेळी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढेल, असे शाह यावेळी म्हणाले.
"नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढेल. या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल देशात आणि जगभरात कुठेही विकू शकेल", असे शाह म्हणाले.
काँग्रेसवरही साधला निशाणा..
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही शाहांनी यावेळी केला. काँग्रेसला शेतकऱ्यांची एवढीच काळजी होती, तर सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये का नाहीत दिले? किंवा मग पंतप्रधान कृषी विमा योजना का नाही लागू केली? किंवा इथेनॉल पॉलिसीबाबतही काही निर्णय का नाही घेतला? तुम्ही हे केले नाही, कारण तुमचा हेतूच योग्य नव्हता.
मागील सरकारने आपल्या एकूण अर्थसंकल्पापैकी शेतीसाठी केवळ २१ हजार कोटी रुपये शेतीसाठी दिले होते. आमच्या अर्थसंकल्पात ही रक्कम १.३४ लाख कोटी करण्यात आली आहे. यासोबतच किसान सन्मान योजनेमधून नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १.१३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे, असे शाह म्हणाले.