नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी शाहीन बागेतील आंदोलक जाणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी 2 वाजता आंदोलक शाह यांची भेट घेणार आहेत. 'अमित शाह यांनी सीएएवर चर्चा करण्यासाठी देशातील नागरिकांना आमत्रंण दिले होते. त्यामुळे, आम्ही आज त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. ज्याच्या मनामध्ये सीएएविषयी शंका आहेत. ते सगळे शाह यांना भेटण्यासाठी जाणार आहेत, असे एका आंदोलकाने सांगितले.
एका मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणाले होते की, सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे. शाहीनबाग येथील आंदोलकांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय असेल तर ते आम्हाला येऊन भेटू शकतात. असा चर्चेचा प्रस्ताव अमित शाह यांनी आंदोलकांसमोर ठेवला होता.
सीएएवर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांची अशी कोणतीच बैठक आयोजीत नसल्याचे गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीमुळे आंदोलकांची अमित शहांसोबत बैठक होणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.
शाहीन बागमध्ये गेल्या 15 डिंसेबरपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते, पण याबाबत अधिक प्रगती झालेली नाही. तसेच याप्रकरणी न्यायालयातही सुनावणी झाली होती. यावेळी सलग ५८ दिवसांपासून एका सार्वजनिक ठिकाणी निदर्शने सुरू ठेवणे चुकीचे आहे. निदर्शने करणे चुकीचे नाही मात्र, सार्वजनिक ठिकाणांना असे अडवून ठेवणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.