नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी सेवा सप्ताहाचे उद्घाटन केले. या वेळी, त्यांनी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्ते स्वच्छता आणि सामाजिक सेवा सप्ताह आयोजित करत आहेत.
शाह यांनी रुग्णालयात स्वच्छताही केली. त्यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, विजय गोयल, विरेंद्र गुप्ता यांनी रुग्णालयाच्या जमिनीची साफसफाई केली. 'जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. लोकांनी आम्हाला सत्ता दिली असून देशभरातील करोडो भाजप कार्यकर्ते मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह मोहीम राबवत आहेत,' असे शाह यांनी सांगितले.