राहुल-प्रियांकांकडून जनतेची दिशाभूल, अमित शाहांचा निशाणा - अमित शाह यांची काँग्रेसवर टीका
रविवारी गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेतली. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रियांका गांधी यांनी सीएएवरून जनतेची दिशाभूल करून दंगली घडवण्याचे काम केले असल्याचे शाह म्हणाले.

नवी दिल्ली - देशभरामध्ये विरोधकांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन सूरू आहे. तर भारतीय जनता पक्ष विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चे आयोजीत करत आहे. रविवारी गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेतली. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रियांका गांधी यांनी सीएएवरून जनतेची दिशाभूल करून दंगली घडवण्याचे काम केले असल्याचे शाह म्हणाले.
पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार होत नाहीत, असा दावा विरोधक करत होते. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी आपले डोळे उघडून पाहावे. दोन दिवसांपुर्वीच पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ असलेल्या ननकाना देव दरबार येथे काही कट्टरतावाद्यांनी दगडफेक केली. हा हल्ला सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी एक उत्तर आहे. तेथील पीडित शीख समुदायाने कुठे जावे, असा सवाल शाह यांनी केला.
अमित शाह यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. आम आदमी पार्टीने २०१५ मधील विधानसभा निवडणुकीवेळी दिल्लीमध्ये १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन दिले होते. त्यांनी अद्याप आपले आश्वासन पूर्ण केले नाही. केजरीवाल यांनी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्नही मार्गी लावला नाही. केजरीवाल यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये किती काम केले. याचा हिशोब जनतेने त्यांना मागावा, अशी टीका शाह यांनी केली.