नवी दिल्ली -देशात अन्य शहरांच्या तुलनेत दिल्लीत कोरोनाचा कहर पाहता दिल्लीची सुत्रे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शाह आपल्या हातात घेणार आहेत. जून महिन्यात दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्ली सरकार हतबल झाले होते. त्यावेळीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण सूत्रे आपल्याकडे घेतली होती.
नॉर्थ ब्लॉक गृह मंत्रालयात अमित शाहंशी भेटणार केजरीवाल -
हिवाळ्याच्या सुरूवातीलाच दिल्लीत कोरोना संक्रमणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज बैठकीसाठी बोलावले आहे. त्यांच्यामध्ये कोरोना नियंत्रणावरून चर्चा होईल. आज सायंकाळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैनही उपस्थित असतील.