नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. सणासुदीचे दिवस त्यात हिवाळ्यामुळे प्रदुषणात वाढ झाल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतील. यावेळी दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
७५० आयसीयू बेड केंद्राकडून मिळणार
डीआरडीओ केंद्रात ७५० आयसीयू खाटा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. तसेच दरदिवशी होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या १ लाखांनी वाढविण्यात येणार आहे, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे केजरीवाल म्हणाले. ऑक्टोबर महिन्याच्या २० तारखेपासून दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांसाठी पर्याप्त खाटा आहेत. मात्र, आयसीयू खाटांची कमतरता आहे. त्यामुळे केंद्राने ७५० आयसीयू खाटा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
आरोग्य कर्मचारी विमानाने दिल्लीत आणणार
दिल्लीत आरटीपीसीआर चाचण्या दुप्पट घेण्यात येतील. आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या मोबाईल टेस्टिंग व्हॅन संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. पालिकेच्या काही स्थानिक रुग्णालयांचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात येणार आहे. येथे मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासोबतच कंन्टेन्मेंट झोन, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची व्यवस्था, अलगीकरण सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता पाहता केंद्रीय सुरक्षा बलाच्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विमानाने दिल्लीला आणण्यात येणार आहे, असे अमित शाह म्हणाले.
जूनमध्येही परिस्थिती हाताबाहेर
जून महिन्यात दिल्लीतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली असता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली होती. तेव्हाही केंद्राकडून दिल्लीला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती. गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सुरक्षा दलांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. आता दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही केंद्राने मदत देऊ केली आहे.