नवी दिल्ली -महाराष्ट्रातील सत्तेच्या पेचाबाबत पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपले मौन सोडले आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्वांना पुरेसा वेळ दिला गेला होता. आमच्यासह शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात असमर्थ ठरली. याआधी कोणत्याही राज्याला सरकार स्थापनेसाठी १८ दिवसांइतकी मुदत दिली गेली नव्हती. त्यामुळे, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, की आजही महाराष्ट्रातील एखादा पक्ष आपले बहुमत सिद्ध करू शकत असेल, तर त्याने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करावा.
राष्ट्रवादीने आधीच पाठवले होते पत्र..
राज्यपालांनी राष्ट्रवादीला ८.३० पर्यंतची वेळ दिली असता, आधीच राष्ट्रपतींना पत्र कसे पाठवले यावरून बराच गदारोळ माजला होता. त्याबाबत बोलताना अमित शाह यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीने दुपारीच राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली होती. तसेच, राज्यपालांकडे अधिक वेळेचीही मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीवर अन्याय झाला असे काही नाही. कोणत्याही पक्षावर याबाबत अन्याय झाला नाही. उलट, त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. आता त्यांना सहा महिन्यांची मुदत मिळाली आहे.