नवी दिल्ली - दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिका सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तेथील वृत्तपत्रांनी हमजाच्या मृत्यूची बातमी दिली आहे.
अमेरिकेला हमजाच्या मृत्यूची गुप्त माहिती मिळाली आहे, असे माध्यमांनी म्हटले आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हमजा कट रचत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यात हमजा बिन लादेनचा पत्ता सांगणाऱ्याला अमेरिकेच्या सरकारने १० लाख डॉलर इनाम जाहीर केला होता.
पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बीन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिका सरकार हमजा बीन लादेनचा शोध घेत आहे. मात्र, यावर सरकारने अधिकृतरित्या कोणतेही उत्तर दिले नाही. हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे किंवा नाही, याबाबत माध्यमांनी माहिती दिली नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हमजाच्या मृत्यूबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
अनेक वर्षांपासून हमजा पाकिस्तान, अफगानिस्तान किंवा सिरियामध्ये राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच तो इराणमध्ये नजरकैदेत असल्याचेही बोलले जात आहे. परंतु, आता हमजाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. अमेरिकेने हमजावर इनाम घोषित केल्यानंतर सौदी अरबियाने त्याचे नागरिकत्व रद्द केले होते.