कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोनाबाधित असलेल्या दोन लहान मुलांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी चालकाने तब्बल ९,२०० रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे हे अंतर केवळ सहा किलोमीटर आहे. पैसे देत नसल्यामुळे या दोन मुलांना आणि त्यांच्या आईला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यासही या चालकाने मागेपुढे पाहिले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षांचा एक मुलगा आणि त्याच्या नऊ महिन्यांच्या भावावर इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ (आयसीएच)मध्ये उपचार सुरू होते. या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला. तेव्हा रुग्णवाहिका चालकाने त्यांना आयसीएचमधून सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी ९,२०० रुपयांची मागणी केली.
केवळ सहा किलोमीटर जाण्यासाठी त्याने एवढे पैसे मागितल्यानंतर, आपण एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे रुग्णांच्या वडिलांनी सांगितले. तसेच, त्याला पैसे कमी करण्याची विनंती केली. मात्र चालकाने त्यांचे ऐकले नाही. उलट, त्याने रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या लहान मुलाचा ऑक्सिजन काढून दोन्ही मुलांना आणि आईला खाली उतरवले.