श्रीनगर- हिंदूंसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी जम्मू काश्मीरच्या बालटाल बेस कँपपासून भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला आहे. रविवारी जम्मूमध्ये झालेल्या स्वागतानंतर भाविकांचा जत्था काश्मीरसाठी रवाना झाला होता. ४५ दिवस चालणारी अमरनाथ यात्रा सोमवारी आौपचारिकरित्या सुरू झाली. १५ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचा समारोप होईल.
'बम बम भोले'चा जयघोष करत २ हजार २३४ भाविकांचा जत्था आधार शिबिरपासून रविवारी यात्रेसाठी निघाला होता. आतापर्यंत देशभरातील दीड लाख भाविकांनी ४५ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी नोंदणी केली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील ३६ किलोमीटर आणि गांदेरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भाविकांना अमरनाथ गुहेचे दर्शन होईल. राज्यपालांचे सल्लागार के. के. शर्मा यांनी यात्रेकरुंच्या ९३ वाहनांना भगवती नगर आधार शिबिरपासून निरोप दिला. भाविकांच्या शांतिपूर्ण प्रवासासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे शर्मा म्हणाले.