नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूमुळे आरोग्य आणिबाणी निर्माण झाली आहे. संपूर्ण देशातील नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. देशातील परिस्थिती पाहता यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. एएनआय वृत्त संस्थने याबाबतची माहिती दिली आहे.
अमरनाथ गुहा जम्मू काश्मीर राज्यामध्ये असून येथे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये यात्रा भरते. 45 दिवसांपर्यंत ही यात्रा चालते. श्रावण महिन्यामध्ये हजारो भाविक शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी अमरनाथला येतात. मात्र, यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून संपूर्ण देश बंद ठेवण्यात आला आहे. सर्व धार्मिक स्थळे ही बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी एकत्र येण्यावर बंधणे घालण्यात आली आहेत. अशा परिस्थिती कोणत्याही यात्रा उत्सवांना परवानगी देण्यात आली नाही. त्यातच आता अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे.
भारतामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 20 हजार 471 झाली आहे. त्यातील 3 हजार 690 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 652 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.