अलवर(राजस्थान)-थेरथल येथील दारुच्या दुकानातील सेल्समनला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. पाच महिन्याचे थकित वेतन मागितल्यानंतर सेल्समनला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. त्याचे शव डीप फ्रिजरमध्ये ठेवलेले आढळले आहे. कमल किशोर असे घटनेतील मृताचे नाव आहे. राजस्थानमध्ये पुजाऱ्याला जाळण्याच्या घटनेनंतर आता पुन्हा भाजप नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना घेरायला सुरुवात केली आहे.
थकित वेतन मागितल्याने जिवंत जाळले वेतन मागितल्याने हत्या केली- कुटुंबियांचा आरोप
कमलने कंत्राटदाराकडे आपले पाच महिन्याचे वेतन मागितले होते, त्यानंतर कंत्राटदार आणि त्याच्या साथीदारांनी पेट्रोल टाकून कमलेशला पेटवून दिले, असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे. मृत कमलच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, कमल गेल्या पाच महिन्यांपासून सुभाष यादव यांच्या दारूच्या दुकानात काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. पगार मागण्यासाठी कमल कंत्राटदाराकडे गेला तेव्हा त्याला जाळण्यात आले. स्वत:चा बचाव करण्यासाठी तो फ्रिजरमध्ये गेला होता जिथे त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत या घटनेत दोन तक्रारी दाखल केल्या आहेत.
भाजप नेत्यांचा कॉंग्रेस सरकारवर हल्लाबोल
या घटनेवरुन भाजप नेत्यांनी कॉंग्रेस सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. अजुनही कॉंग्रेसकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. आधी करौलीतील घटनेची अलवरमध्ये पुनरावृत्ती झाली आहे, याचाच अर्थ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.