अहमदाबाद- लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरातमधील काँग्रेसचा युवा चेहरा आणि ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दरम्यान, अल्पेश ठाकोर आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
अल्पेश ठाकोर काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला होता. त्यावेळी या ओबीसी नेत्याने ठाकोर समाज बांधवांच्या हितासाठी सुरू असलेली ही लढाई सुरू असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळण्यात आली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेलला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उत आला आहे.
ठाकोर सेना समितीने मंजूर केलेल्या ठरावात झाला अल्पेश आणि भरतजी ठाकोर या तिघांना काँग्रेस सोडण्यास सांगण्यात आले आहे. सध्यस्थितीत हे तिघेही काँग्रेसचे आमदार आहेत. ठाकोर समाजाच्या मागण्यांकडे पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाकोर सेना समितीने हा ठराव मंजूर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या तरी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे धवलसिंह झाला यांनी स्पष्ट केले.
गुजरात काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरु आहे. त्यावर आपण नाराज आहोत अशी कबुली ठाकोर यांनी महिन्याभरापूर्वी दिली होती. मी पक्षाध्यक्षांच्या कानावर सुद्धा ही बाब घातली आहे. तरुण नेत्यांना पक्षात योग्य संधी मिळाली पाहिजे. तुम्ही मलाच सर्व काही द्या असे मी म्हटलेले नाही. मला पक्षाकडून योग्य तो मानसन्मान मिळाला आहे. ठाकोर समाजासाठी मी अनेक मागण्या केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला होता.