बलात्काराच्या प्रकरणात स्वामी चिन्मयानंद यांना उच्च न्यायालयाकडून जामीन - -SWAMI CHINMAYANAND BAIL
बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने त्याच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
शहाजहापूर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचं सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनंही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात चिन्मयानंद यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७५ सी (पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण) ३५४ डी (मारहाण), ३४२ आणि ५०६ (गुन्हेगारी कृत्य) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. याच पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.