लखनऊ -अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर काही राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रे ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. तर, कर्नाटक, जम्मू आणि मध्यप्रदेश सरकारनेदेखील आपापल्या राज्यांतील शाळांना उद्या सुटी जाहीर केली आहे.
दुसरीकडे, सुरक्षेच्या कारणास्तव गोवा, जम्मू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये; तर भोपाळ आणि बंगळुरू या शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादग्रस्त जमिनीविषयीचा निर्णय राखून ठेवत असल्याचे न्यायालयाने १६ ऑक्टोबरला म्हटले होते. सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर आता या विवाद प्रकरणात निर्णय येणार आहे. १७ नोव्हेंबरला म्हणजेच सरन्यायाधीश गोगोई यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आतापर्यंत वर्तवण्यात येत होती. मात्र, आता उद्याच (शनिवार) या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर प्रदेशमध्ये, विशेषतः अयोध्येत चार हजार लष्करी जवानांना तैनात केले आहे. तसेच, सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : अयोध्या प्रकरण : उद्या होणार निकाल जाहीर!