नवी दिल्ली - अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकराणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे सुशांतच्या कुटुंबाचे यश आहे. बिहारमध्ये या प्रकरणी दाखल झालेली एफआयआर न्यायालयाने ग्राह्य धरली आहे, अशी प्रतिक्रिया सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व तपास सीबीआय करेल असे सांगतले आहे. या निर्णयावर सुशांतसिंहचे कुटुंबीय समाधानी असून लवकरच न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे, असेही विकास सिंह म्हणाले.
सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमबाबत बोलून अभिनेत्री कंगणा राणावतने या प्रकरणात उडी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर कंगणाने देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मानवता जिंकली', असे ट्विट कंगणाने केले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. 'न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय ! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा !' असे फडणवीसांनी ट्विट केले आहे.