नवी दिल्ली : भारत- चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मागितली. तसेच चीनने 5 मे ला पहिल्यांदा भारतीय भूमीत अतिक्रमण केले तेव्हा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवायला हवी होती, असे मत व्यक्त केले. सीमेवरील सद्यस्थिती आणि लष्करी तयारीची माहिती त्यांनी सरकारकडे मागितली.
संपुर्ण देशाला मोदींनी विश्वास द्यावा
चीनबरोबरच्या सीमा वादानंतर पुढे काय? सीमेवर ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा होईल आणि चीनचे सैनिक भारतीय भूमीतून माघारी जातील याबाबत संपूर्ण देशाला पंतप्रधानांनी विश्वास द्यावा, असे सोनिया गांधी म्हणाल्या. लष्कराच्या पाठीशी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकमताने असल्याचेही त्या म्हणाल्या.
सोनिया गांधींनी उपस्थित केलेले 10 प्रश्न
- चीनी सैनिकांनी कोणत्या दिवशी लडाखमध्ये घुसखोरी केली?
- चीनची घुसखोरी सरकारच्या केव्हा लक्षात आली?
- सरकार सांगत असल्याप्रमाणे 5 मे ला की, त्याआधी चीनने घुसखोरी केली?
- भारत सरकारला वेळेवर सॅटेलाईट छायाचित्रे मिळत नाहीत का?
- सीमेवर काहीतरी वेगळ्याच हालचाली होत आहेत, याची माहिती गुप्तचर संघटनांनी दिली नाही का?
- सीमेवर चीनने घुसखोरी केली असून मोठ्या प्रमाणात लष्कर जमा करत आहे, याबाबत लष्करी गुप्तचर विभागाने सरकारला सतर्क केले नाही का?
- चीनचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराची तयारी कशी आहे?
- सरकारच्या म्हणण्यानुसार हे गुप्तचर यंत्रणांच अपयश आहे का?
- चीनबरोबरच्या सीमा वादानंतर पुढे काय?
- एप्रिल महिन्यापासून भारत चीन सीमेवर काय घडले?
5 मे ते 6 जूनच्या दरम्यान भारताने महत्त्वाचा वेळ वाया घालवला, असे काँग्रेस पक्षाचे मत आहे. 6 जूननंतरही राजकीय आणि राजनैतिक स्तरावर चर्चा व्हायला हवी होती. सर्वबाजूने चर्चा करण्यास आपण अपयशी झालो. त्या सर्वांचा परिणाम म्हणजे आपण 20 सैनिक गमावले आणि अनेक जखमी झाले. पंतप्रधान मोदींनी एप्रिल महिन्यापासून सीमेवर काय घडले, हे सांगावे, अशी मागणी सोनियां गांधी यांनी सरकारकडे केली.