नवी दिल्ली - काँग्रेस हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष निवडला जाईल अशी चर्चा असताना सोनिया गांधींच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सर्वाधिकार सोनिया गांधींच्याकडे असणार आहेत.
राहुल गांधींनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील अस्थिरतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याने अध्यक्ष निवडीवर चर्चा झाली नाही, असे राहुल गांधींनी बैठकीनंतर सांगितले. सध्या कोणत्या पद्धतीने पक्षाचे काम चालू आहे, याची माहिती घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये समोर आलेल्या अहवालानुसार काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बिकट असल्याचे स्पष्ट होत आहे. काश्मीरमध्ये हिंसा केली जात आहे. काश्मीरचा विषय पुढे आल्यानंतर आम्ही आमची चर्चा थांबवली आणि जम्मू-काश्मीरमध्ये काय चालले आहे यावर आमचे सादरीकरण सुरू झाले. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये सध्या काय सुरू आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगावे, असे राहुल गांधी म्हणाले.