COVID-19 LIVE :
- नवी दिल्ली -दिल्लीमध्ये कोरोना विषाणूमुळे एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. कोमॉर्बिडिटी (मधुमेह आणि अतितणाव) यासोबतच कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मुलीलाही कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आले आहे. आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी ही माहिती दिली.
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीममध्ये सुट्टी जाहीर झाल्याचे एक परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ते परिपत्रक आरोग्य मंत्रालयाकडून आलेले नसून, फेक असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा :कोरोना व्हायरस: सुट्टी जाहीर नाही... 'ते' परिपत्रक खोटे!
- ब्राझीलच्या पंतप्रधानांनी फेटाळले 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याचे वृत्त..
ब्राझीलचे पंतप्रधान जैल बोल्सोनारो यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले होते. काही प्रतिष्ठित माध्यमांनी आपल्या ट्विटर हँडल्सवरून याबाबतची माहिती दिल्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आता बोल्सोनारो यांनी स्वतःच पुढे येत आपल्याला या विषाणूची लागण झाली नसल्याचा निर्वाळा दिला आहे. मी कोरोना 'निगेटिव्ह' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- मुंबई- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मुंबईच्या टिळकनगर येथेही कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. या ६४ वर्षीय रुग्णावर कस्तुरबा उपचार सुरू असून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी सुरू आहे.
वाचा :मुंबईत आढळला आणखी एक कोरोना संशयित, कस्तुरबा रुग्णालयात दाखल
- कर्नाटकातील कोरोना बळीच्या निकटवर्तीयांची तपासणी सुरू..
बंगळुरू- देशातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या कर्नाटकच्या कलबुर्गीमधील रुग्णाच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या तीस जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये त्या रुग्णाला ज्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामधील चार जणांना विशेष कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
- एअर इंडियातर्फे इटली, फ्रान्ससह अन्य चार देशांतील विमानसेवा बंद..
मुंबई -इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेला जाणारी विमाने एअर इंडियाने रद्द केली आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने चीन, कुवैत अशा देशांमधील विमानसेवा बंद केल्या आहेत.
- जम्मू-काश्मीरमध्ये आढळला नवा रुग्ण..
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळला आहे. नवा रुग्ण हा पहिल्या रुग्णाचा निकटवर्तीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे काश्मीरमधील प्रमुख भूपिंदर कुमार यांनी ही माहिती दिली. यामुळे, भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ८२ झाली आहे.
- तामिळनाडूमधील पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर..
चेन्नई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील सर्व पूर्व-प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. तर कन्याकुमारी, नेल्लाई, टेंकासी, थेनी, कोईंबतुर, तिरुपुर आणि निलगिरी जिल्ह्यांमधील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत या शाळा बंद राहतील असे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.
- 'मुलान' आणि 'द न्यू म्युटंट'चे प्रदर्शन पुढे ढकलले..
डिस्नेचा बहुचर्चित 'मुलान' आणि मार्वल स्टुडिओच्या एक्स-मेन शृंखलेमधला 'द न्यू म्युटंट' या दोनही सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुलान हा २७ मार्च, तर द न्यू म्युटंट हा ३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे, सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले.
यापूर्वी, 'नो टाईम टू डाय' हा बॉन्डपट, 'अ क्वाएट प्लेस -२' हा हॉरर चित्रपट, आणि फास्ट अँड फ्युरिअस शृंखलेमधला 'एफ-९' या हॉलिवूडपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले होते. त्यातच आता या नव्या दोन चित्रपटांचाही समावेश झाला आहे.
- सर्वोच्च आणि दिल्ली उच्च न्यायालयात होणार केवळ महत्त्वाच्या सुनावण्या..
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात आणि दिल्ली उच्च न्यायालयात आता केवळ अतिमहत्त्वाच्या प्रकरणांसंबंधी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केवळ एखाद्या खंडपीठाला आवश्यक वाटल्यास त्या खटल्यावर सुनावणी होणार आहे. यावेळी केवळ खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिंनाच तिथे उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.
दिल्ली उच्च न्यायालयाने पुरावे सादर करण्यासाठी शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा, असे सुचवले आहे. तसेच न्यायालयात येणाऱ्या इंटर्न्सला बंदी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलली..
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रसार पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने सर्व लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लष्कराने आपल्या जवानांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत.
जिथे जिथे शक्य आहे, तिथे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला प्राधान्य द्यावे, असेही लष्कराने अधिकाऱ्यांना सुचवले आहे. तसेच, विविध ठिकाणच्या मुख्यालयांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या मानेसार, जोधपूर, जैसलमेर, झांसी, बिन्नागुरी आणि गया याठिकाणी विशेष आरोग्यकेंद्रे उभारण्यात आली आहेत.
- कोरोनाच्या बळींनी गाठला पाच हजारांचा टप्पा..
शुक्रवारी कोरोनाच्या बळींनी पाच हजारांचा टप्पा गाठला. आतापर्यंत जगभरात या विषाणूमुळे ५,११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १,३९,०१८ जणांना याची लागण झाली आहे. यासोबतच, जवळपास सत्तर हजार लोक यातून बरेही झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३,१७७ बळी आढळून आले आहेत. तर, इटलीमध्ये १,०१६; इराणमध्ये ५१४, स्पेनमध्ये १२० तर, दक्षिण कोरियामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३३ देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे.
- इराणमध्ये कोरोनाला लढा देण्यासाठी लष्कराला पाचारण..
तेहरान - कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी आता इराणच्या लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पुढील चोवीस तासात देशातील सर्व रस्ते मोकळे करण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहे. शहरातील कोणीही नागरिक रस्त्यांवर दिसणार नाही, याची दक्षता लष्कराने घ्यायची आहे. चीनबाहेर कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या देशांपैकी इराण एक आहे. आतापर्यंत इराणमध्ये कोरोनाचे ११,३६४ रुग्ण आढळले असून, साधारणपणे ५१४ नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे.
- केरळमध्ये आढळले दोन नवे रुग्ण; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ वर..
तिरूवअनंतपुरम - केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. या १९ रुग्णांव्यतिरिक्त आणखी तीन रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- नागपूर -कोरोनाचा प्रसार देशभरात वाढत असताना, याबाबत विविध अफवाही त्याच वेगाने पसरत आहेत. अशातच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच कोरोनाची लागण झाल्याची अफवा समाजमाध्यमांमध्ये पसरली होती. त्यामुळे मनस्ताप झाल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित वेब पोर्टल्सवर कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
वाचा :जिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण... अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना
- नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत. १५ मार्च आणि १८ मार्चला अनुक्रमे लखनऊ आणि कोलकातामध्ये हे सामने खेळले जाणार होते.
वाचा :भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका रद्द!
- भारत-बांगलादेश बस आणि रेल्वेसेवा १५ एप्रिलपर्यंत बंद..
भारत आणि बांगलादेशदरम्यानची बस आणि रेल्वेसेवा १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अनिल मलिक यांनी ही माहिती दिली. यासोबतच, भारत आणि नेपाळ सीमेवरील चार चेकपोस्ट सुरु राहणार असून, भूतान आणि नेपाळच्या नागरिकांचा व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- मिलानमधील भारतीय विद्यार्थ्यांना 'एअर इंडिया' आणणार मायदेशी..
नवी दिल्ली - इटलीच्या मिलान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान जाणार आहे. शनिवारी दुपारी हे विमान भारतातून रवाना होईल, तर रविवारी दुपारी ते दिल्लीमध्ये परतणार आहे. नागरी-उड्डाण मंत्रालयाच्या सह-सचिव रुबीना अली यांनी ही माहिती दिली. इटलीमधील मिलान शहरामध्ये आणि परिसरात जवळपास २२० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या सर्वांना मायदेशी आणण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. तरीही, कोणी विद्यार्थी मागे राहिल्यास ते इटलीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते दम्मू रवी यांनी दिली.
- पंजाबमधील सात संशयित बेपत्ता..
कोरोनासंबंधी देशभरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. मात्र, पंजाबमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सात संशयित रुग्ण पंजाबमधून बेपत्ता झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व पंजाबच्या लुधियानामधून बेपत्ता झाले आहेत.
- ओडिशा अन् उत्तर प्रदेशमधील शाळा-महाविद्यालये बंद..
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, पुढील सूचना मिळेपर्यंत उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे चालू राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर, ओडिशामधील सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ही माहिती दिली. यासोबतच, मार्च महिनाअखेरपर्यंत राज्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव आणि व्यायामगृहे बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
- मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे, सर्व भागांमधील शाळांना बंद ठेवता येणार नाही. तसेच, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधीलही दहावी अन् बारावी वगळता बाकी शाळा बंद राहणार आहेत, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.
यासोबतच मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुण्यामधील जलतरण तलाव, नाट्यगृहे, आणि व्यायामगृहे बंद राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनासंबंधींचे सर्व निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे, आणि कर्मचाऱ्यांनी शक्यतो घरातूनच काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
वाचा :कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील जिम्स, नाट्यगृहे बंद..
- नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. मालदीव, श्रीलंका आणि नेपाळ देशांच्या प्रमुखांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता कोरोनाला लढा देण्यासाठी 'सार्क' देश एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाचा :कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मोदींचे 'सार्क'ला आवाहन; 'या' देशांनी दर्शवली सहमती
- मुंबई- कोरोना विषाणूच्या तपासणीसाठीची परवानगी खासगी रुग्णालयांनाही देण्यात यावी, अशी मागणी आमदार राम कदम यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये आज केली. यावर उत्तर देताना, केंद्राच्या परवानगीशिवाय असे आदेश देता येत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केंद्राने अशी परवानगी द्यावी, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा :कोरोना व्हायरस: 'केंद्राने परवानगी दिली तरच खासगी रुग्णालयात तपासणी'
- कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना हस्तांदोलन टाळण्याचे आवाहन केले आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना विषाणू पसरत आहे, त्यामुळे शक्यतो हस्तांदोलन टाळून नमस्कार करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
वाचा :कोरोना विषाणू दहशत : 'हस्तांदोलन टाळा अन् नमस्कार करा'
- महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १७ वर..
पुणे -पुण्यात आणि नागपुरात शुक्रवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.
- कर्नाटक, हरियाणातील सर्व विद्यापीठे बंद..
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्नाटक राज्यातील सर्व मॉल, चित्रपटगृहे, पब आणि नाईट क्लब तसेच, विद्यापीठेही बंद करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तसेच, हरियाणामधील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
- नागपूर -जिल्ह्यामध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १६ वर पोहोचली आहे.
वाचा :कोरोना व्हायरस: नागपुरातील 'त्या' व्यक्तीच्या दोन नातेवाईकांनाही लागण
- पुणे - पुण्यात कोरोना संक्रमित आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ९ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या १४ वर गेली आहे.
वाचा : पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ वर
- मुंबई - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 10 च्या वर गेली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातील काही रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीती पसरली आहे. आरोग्य खात्याने सॅनिटायझरचा आणि आवश्यकता असेल त्यांनी मास्कचा वापर करा असे, सांगितल्यानंतर सॅनिटायझरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सॅनिटायझरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
वाचा :मुंबईकरांमध्ये कोरेनाची धास्ती; सॅनिटायझर, मास्कचा तुडवडा
- नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील कोरोनाच्या एका संशयित रुग्णाला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौदी अरेबिया येथून भारतात आलेल्या या संशयिताला सध्या हिमायतनगरमधील ग्रामीण रूणालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
वाचा :कोरोना संशयिताला नांदेड शासकीय रुग्णालयातून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात हलवले
- यवतमाळ -भारत हा सर्वाधिक कापूस उत्पादक देश आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. यवतमाळमध्ये कोरडवाहू शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड करतात. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 80 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होते. यातून 30 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस आणि आता कोरोनामुळे कापसाचे भाव पडले आहेत. तसेच निर्यात देखील घटली आहे.
वाचा :'कोरोना व्हायरस'चा कापूस उद्योगावर परिणाम; निर्यात घटली
- ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
वाचा :काळजी घ्या ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- पालघर - देशात आणि राज्यात कोरोनाचे अनेक संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी होणाऱ्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील प्रसिद्ध 'बोहाड यात्रा' आणि विक्रमगड तालुक्यातील 'वेहेलपाडा यात्रा' रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिले आहे.
वाचा :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमधील 'बोहाड यात्रा' व 'वेहेलपाडा यात्रा' रद्द
- अमरावती - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात देखील कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती उपाययोजना करावी, यासाठी अमरावतीत जनजागृती करण्यात येत आहे.
वाचा :अमरावतीत 'कोरोना' विषाणूपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती
- जळगाव - जागतिक बाजारपेठ आर्थिक मंदीत सापडली आहे. त्यातच आता जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने जागतिक बाजारपेठ अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहे. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात प्रचंड घसरण झालेली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी खाली आले आहेत.
वाचा :शेअर बाजार कोसळल्याने सोन्याची झळाळी उतरली; जळगावात सोने दीड हजाराने स्वस्त
- जळगाव - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरासह देशातही धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 15 हून अधिक संसर्ग झालेले तथा संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर 'कोरोना'चा जळगावात शिरकाव झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या विषयासंदर्भात ही केवळ अफवा आहे, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
वाचा :'कोरोना'चा जळगावात शिरकाव नाही... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- सांगली - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला लक्षात घेऊन १०० वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी पार पडणारे संमेलन तात्पुरते स्थगित झाले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही याबाबत घोषणा केली.
वाचा :कोरोनाचा प्रभाव; सांगलीतील १०० वे नाट्य संमेलन रद्द
- नवी दिल्ली -जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला 'जागतिक महामारी' घोषित केल्यानंतर केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये कोरोनाला महामारी घोषित केले आहे. सरकारने ३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे आणि सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा :दिल्ली सरकारकडून 'कोरोना' 'महामारी' जाहीर; सर्व शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद
- नवी दिल्ली - केंद्र सरकराने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे. तर महाराष्ट्रातील नागरिक ०२० - २६१२७३९४ या नंबरवर संपर्क साधू शकतात. याबरोबरच १५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठीही मदत क्रमांक जारी केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत माहीत दिली.
वाचा :कोरोना: केंद्र सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी जारी केले हेल्पलाईन नंबर
- बंगळुरु-कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयासह सिनेमागृहेही अनेक राज्यांनी बंद ठेवली आहे. मात्र, कोरोनाचा फटका आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही बसायला लागला आहे. बंगळुरुमधल्या गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
वाचा :कोरोना व्हायरस: संसर्गाच्या भीतीनं भारतातील गुगलंच ऑफिस बंद
- ओटावा -जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. अनेक देशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा :कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण
- वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हस्तांदोलन करण्याएवजी भारतीय पद्धतीने नमस्कार करणे पसंद केले.
वाचा :कोरोनाच्या भीतीनं हस्तांदोलन टाळत डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नमस्कार