तवांग - सध्या भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. अरुणाचलच्या तवांगमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलातील जवान (आयटीबीपी) तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सीमवेर कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीचा सामना करत जवान हाय अलर्टवर आहेत. आम्ही देशाचे संरक्षण करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे. त्यानुसार कर्तव्य पार पाडत असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आहे, असे आयटीबीपीच्या 55 बटालियनचे कमांडंर आय.बी.झा यांनी म्हटलं.
पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर दोन्ही देशांदरम्यान असलेल्या संघर्षात आयटीबीपीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या एप्रिल-मेमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी चीनच्या सैनिकांशी लढताना मोठे शौर्य दाखवले. त्यामुळे अरुणाचलमध्ये तैनात असलेल्या सैन्याला यापासून प्रेरणा मिळाली आहे, असेही झा म्हणाले.