नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून दिल्ली शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवस प्रदूषण अतिशय गंभीर पातळीवर होते. मात्र, आता दिल्ली एनसीआर भागातील प्रदूषण गंभीर पातळीच्याही पलिकडे गेले आहे. त्यामुळे सर्व शाळा ५ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
हेही वाचा - दिवाळीनंतर धुराने वेढली दिल्ली, प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर
प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ५ नोव्हेंबरपर्यंत शहरात बांधकाम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण हिवाळ्यात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. खराब हवेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रदूषण नियामक विभागाने दिल्ली एनसीआर भागात येणाऱ्या उत्तरप्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका समितीने दिल्लीमध्ये आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे.
हेही वाचा -भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी प्रदूषण बनला चिंतेचा विषय
दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या काळामध्ये हवेचा निर्देशांक ३४८ नोंदवण्यात आला होता. तसेच शेतकरी शेत स्वच्छ करण्यासाठी पिकांचा निकामी भाग जाळत असल्याने देखील प्रदूषण वाढत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.