केरळ - एअर इंडियाच्या बोईंग 737 या विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. विमान दुबईहून करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते. दरम्यान विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला. विमानात 191 प्रवासी होते. या अपघातात मुख्य पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
बोईंग 737 हे विमान करिपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लॅंड करत होते. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरले आणि दरीत जाऊन कोसळले. या अपघातात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातात मुख्य पायलट कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व रुग्णांना उपचार्थ मल्लापुरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचाव कार्य संपले आहे.