नवी दिल्ली - 'एअर इंडिया'ने चीनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानांवरील स्थगिती ३० जूनपर्यंत वाढवली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत तब्बल दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
याआधी कंपनीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत दिल्ली-शांघाई वाहतूक करणाऱ्या आपल्या सहा विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. मात्र, चीनमधील परिस्थिती अद्याप आटोक्यात न आल्याने, ही विमान वाहतूक पुन्हा सुरू न करता, ३० जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने दिल्ली-हॉंगकॉंग मार्गावरील विमान वाहतूकही स्थगित केली आहे.