अंबाला -विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथा आता व्हिडिओ गेमद्वारे पाहायला मिळणार आहे. अभिनंदन यांचा पराक्रम दाखवण्यासाठी वायुदलाने हा व्हिडिओ गेम तयार केला आहे. या गेममध्ये कमांडर अभिनंदन हे मुख्य हिरो राहणार आहेत. हा गेम मोबाईल प्ले स्टोअरवर अॅन्ड्राईड आणि आयओएसवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विंग कमांडर अभिनंदन हे या व्हिडिओ गेममध्ये मिग-२१ हे विमान उडवताना दिसणार आहेत.
या गेमद्वारे नेटकऱ्यांनाही जवानांच्या शौर्याचा अनुभव येईल, असे वायुदलाने म्हटले आहे.
कसा आहे हा गेम -
मोबाईल गेमची सुरुवात मिग-२१ या विमानापासूनच होणार आहे. विंग कमांडर अभिनंदन यांनी ज्याप्रकारे या विमानाद्वारे पाकिस्तानच्या एफ -१६ या विमानाला पाडले होते. तशीच या गेमची सुरुवात राहणार आहे. सुरुवातीला हा सिंगल प्लेअर मोडवर उपलब्ध असेल. त्यानंतर हा मल्टी प्लेअर मोडसाठी विकसित केला जाईल.
मिग -२१ व्यतिरिक्त यामध्ये 'राफेल'चाही समावेश असणार आहे. या गेमचा व्हिडिओ वायुदलाने प्रदर्शित केला आहे. यामध्ये राफेल व्यतिरिक्त वायुदलाचे विमान 'सुखोई- ३० एमकेआय', 'मिग २९' आणि बालाकोटमध्ये बॉम्बस्फोट घडवुन आणणारे 'मिराज २०००' या विमानांनाही अॅनिमेशन पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. या गेममध्ये भरपूर आव्हान राहणार आहेत.
दिल्लीमध्ये विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की हा व्हिडिओ गेम ३१ जुलै रोजी लॉन्च केला जाईल. हा फक्त एक खेळ आहे. युजर्स याचा आनंद घेऊ शकतील. तसेच, त्यांना आपल्या वीर जवानांच्या शौर्याबद्दलही माहिती होईल, असेही त्यांनी सांगितले.