दिशा प्रकरण: एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करण्यासाठी हैदराबादला रवाना - four dead in hyd case
दिशा सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार मृतांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यासाठी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हैदराबादला रवान झाले आहे. घटनास्थळी आरोपींना चौकशीसाठी नेले असता चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले होते.
दिशा प्रकरण
हैदराबाद - दिशा सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार मृतांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यासाठी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हैदराबादला रवान झाले आहे. घटनास्थळी आरोपींना चौकशीसाठी नेले असता, चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले होते. यावरून संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून २३ डिसेंबरच्या आत शवविच्छेदन करण्याचे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने काल(शनिवारी) दिले आहेत. त्यानुसार आज ३ न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक हैदराबादला रवाना झाले आहे. शवविच्छेदन करतानाचे व्हिडिओ शुटींग करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यानतंर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवावे, असे आदेश गांधी रुग्णालयाच्या प्रमुखांना दिले आहेत. सर्व पुरावे विशेष तपास पथकाला सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील शवागरामध्ये चारही मृतदेह ठेवण्यात आले आहेत. २७ नोव्हेंबरच्या रात्री एक पशुवैद्यकीय महिला डॉक्टर घरी येत असताना तिची गाडी पंक्चर झाली. त्यावेळी मदत करण्याच्या बहाण्याने चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यानंतर हत्याकरून मृतदेह पेटवून देण्यात आला. ही घटना हैदराबाद जवळील शमशाबाद येथे घडली.
या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली होती. ६ डिंसेबरला पहाटे घटनास्थळी आरोपींना चौकशीसाठी नेले असता, आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून देशभरामध्ये खळबळ उडाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी आता तपास सुरू आहे.