आबू रोड - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तीन आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. पडझड टाळण्यासाठी त्यांनी पक्षातील इतर आमदारांशी संपर्क साधून त्यांना गुजरातमधील विविध हॉटेल, खासगी बंगल्यांमध्ये ठेवले होते. मात्र, आता अधिक खबरदारी म्हणून काही आमदारांना राजस्थानातील आबू रोड येथील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. शनिवारी हे आमदार या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसचे हे चार आमदार गुजरात-राजस्थान सीमेजवळील अंबाजी येथे दिसले होते. याविषयी अधिक माहिती घेतली असता, त्यांना राजस्थानातील आबू रोड येथील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आल्याचे समजले आहे. याआधी काँग्रेसने मार्चमध्ये आपल्या आमदारांना जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये पाठवले होते. तेव्हा 26 मार्चला प्रस्तावित असलेल्या राज्यसभा निवडणुकांआधी त्यांच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.