नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करत असलेल्या 3 हजार 600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेले आणि नंतर सरकारी साक्षीदार बनलेल्या राजीव सक्सेना यांना दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला.
विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्सेना यांना दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांच्या जामीन अर्जाला तपास यंत्रणेने तीव्र विरोध दर्शविला होता. आता हे प्रकरण 11 डिसेंबर रोजी सुनावणीला येईल.
सीबीआयने 19 सप्टेंबर रोजीया प्रकरणात कथित मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल आणि सक्सेना यांच्यासह 15 आरोपींविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने याची दखल घेत आरोपींना 23 ऑक्टोबरला समन्स बजावले होते.