महाराष्ट्र

maharashtra

देशाचे कृषीमंत्री कृषी कायद्यांची स्पष्ट माहिती देत नाहीत; शरद पवारांची टीका

By

Published : Feb 1, 2021, 9:44 AM IST

देशात नवीन कृषी कायद्यांमुळे मोठा गोंधळ माजला आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पही सादर होत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्यावर टीका केली आहे.

Sharad Pawar and Narendra Singh Tomar
शरद पवार आणि नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली - देशात कृषी कायद्यांवरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यावर टीका केली आहे. कृषी कायद्यांबाबतची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्यात तोमर अयशस्वी होत असल्याचे मत पवार यांनी मांडले आहे.

नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जनतेची दिशाभूल करत असून, हे चित्र निराशाजनक आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी तोमर यांच्यावर पलटवार केला आहे.

शरद पवार यांनी कृषी कायदे आणि तोमर यांच्याबाबत ट्विट केले आहेत. कृषीमंत्री नवीन कायद्यांतील तरतुदी स्पष्टपणे लोकांसमोर मांडण्यात अपयशी ठरले आहेत. नवीन कृषी कायद्यांचा बाजारपेठांवर परिणाम होणार आहे की, नाही हे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही.

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी त्यांचा माल बाजारपेठेबाहेर विकू शकतो. मात्र, खासगी खरेदीदारांना शेतीमाल विकताना शेतकऱयांना हमीभावाची शाश्वती नसणार आहे. यामुळेच शेतकरी सुरुवातीपासून कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱयांना याबाबत अगोदर माहिती देणे आवश्यक होते. शेतकऱयांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, सरकारने तसे न करता परस्पर कायदे मंजूर करून घेतले, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांना तोमर यांनी प्रत्युत्तर दिले होते. शरद पवार यांना कृषी विभागाचा चांगलाच अनुभव आहे. आताच्या कृषी कायद्यांतील तरतुदी पवारांनी त्यांच्या कार्यकाळात आणण्याचा प्रयत्न केला होता, असे तोमर म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details