नवी दिल्ली - राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी, हा निर्णय म्हणजे वायफळ मोहिमांवर अवलंबून असणाऱ्या राजकारणी आणि पक्षांना चपराक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
फ्रेंच कंपनी 'दसॉल्ट एव्हिएशन'कडून 'राफेल' लढाऊ विमान खरेदी प्रकरणातील 2018च्या केंद्र सरकारला क्लीन चिट देण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
शाह पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे मोदी सरकार हे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक असल्याचाच जणू पुरावा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राफेलच्या मुद्यावरून संसदेमध्ये खंड पाडणे हे चुकीचे होते, हेदेखील आता सिद्ध झाले आहे. या सर्वामध्ये जो वेळ वाया गेला, तो लोक कल्याणासाठी वापरता आला असता.
काँग्रेस आणि त्यांच्या अध्यक्षांसाठी राजकारण हे नेहमीच देशहितापेक्षा जास्त महत्त्वाचे राहिले आहे. आजच्या निर्णयानंतर त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे म्हणत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.