नवी दिल्ली- केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. खोऱ्यात 10 दिवस राहिल्यानंतर अजित डोवाल आज(शुक्रवारी) दिल्लीत परतले आहेत. या दहा दिवसात डोवाल यांनी खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
जम्मू-काश्मीरमध्ये उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी खोऱ्यातील नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत जेवण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतले समजले जातात. ३७० कलम हटवल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डोवाल हे तेथे गेले होते. बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी सुद्धा डोवाल यांनी संवाद साधला होता. विशेष, म्हणजे डोवाल हे जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथेही गेले होते. यावेळी त्यांनी लोकांशी चर्चा करुन त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता.
गेल्या महिन्यात अजित डोवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता, येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.