मुंबई –अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सर्व पुरावे व दोन महिन्यांत नोंदविलेले सर्व जबाब देण्यासाठी सीबीआय मुंबई पोलिसांना पत्र लिहिणार आहे.
सीबीआयमधील सुत्राच्या माहितीनुसार, अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यात काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. या सर्व व्यक्तींचे जवाबाची कागदपत्रे सीबीआय ताब्यात घेणार आहे. तसेच सीबीआय मुंबई पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांमधील पुरावेही घेणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस गुढ होत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता राजपूत ( वय 34) हा 14 जूनला मुंबई वांद्रामधील फ्लॅटमध्ये मृत आढळला होता. गेल्या आठवड्यात सीबीआयने सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह आणि त्याची मोठी बहिण राणी सिंह यांचा जबाब नोंदविला आहे.
सीबीआयने अभिनेता राजपूतच्या मृत्यूप्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, तिचे वडील इंद्रजीत, तिची आई संध्या यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तसेच सुशांतसिंहचा हाऊस मॅनेजर सॅम्युयल मिरांडा, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि इतर अज्ञातांविरोधातही सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यास केंद्र सरकारने 5 ऑगस्टला मंजुरी दिली आहे. सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिग प्रकरणातही 31 जुलैला गुन्हा दाखल केला आहे. तर बिहार पोलिसांनी अभिनेता सुशांतसिंहच्या वडिलांच्या तक्रारीनुसार स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले आहे.