नवी दिल्ली - देविंदर सिंह या पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेनंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पुलवामा प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
दहशतवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी जम्मू काश्मीरमधील पोलीस अधिकारी देविंदर सिंहला अटक करण्यात आली होती. या खळबळजनक प्रकरणानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्यातच अधीर चौधरी यांनी या प्रकरणावरून सरकारवर आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांवर चांगलीच टीका केली आहे.
'देविंदर सिंह'च्या जागी 'देविंदर खान' असता, तर आरएसएसचे लोक अधिक कठोरपणे बोलके झाले असते. देशाच्या शत्रूंचा आपण रंग, पंथ आणि धर्माचा विचार न करता निषेध केला पाहिजे. आता खरा प्रश्न हा आहे, की पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचे खरे दोषी कोण होते? या प्रकरणावर आता पुन्हा प्रकाश टाकला पाहिजे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी देविंदर सिंह या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शनिवारी अटक केली होती. दहशतवाद्यांना घरामध्ये थारा देण्यासाठी आणि स्वत:च्या गाडीतून घेवून जाण्यासाठी देविंदर सिंह याने १२ लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. शनिवारी सिंह याला २ दहशतवाद्यांना कारमध्ये जम्मूला घेवून जाताना अटक करण्यात आली होती. कुख्यात दहशतवादी नावेद बाबा याला शोपिया जिल्ह्यातून जम्मू येथे घेवून जात असताना पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा : कुख्यात दहशतवाद्यांसाठी देविंदर सिंगने घेतले १२ लाख, घरीही दिला होता आश्रय