लखनऊ -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्रीय नगरविकास विभागाने दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्या आता लखनऊला राहायला जाणार आहेत. उत्तरप्रदेशातील 2022 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रियंका गांधी तयारीला लागल्या आहेत. उत्तरप्रदेशात काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याचे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले आहे.
केंद्रीय नगर विकास विभागाने दिल्लीतील अतिसुरक्षित लोधी रोडवरील ल्युटेन्स भागातील बंगला खाली करण्याचे आदेश प्रियंका गांधी यांना दिले आहेत. एसपीजी या विशेष सुरक्षेचे कवच मागील वर्षी हटविल्यानंतर त्यांना आता बंगला सोडण्यास सांगण्यात आले आहे. विशेष सुरक्षा हटविल्यामुळे आता हा बंगला खाली करण्याचा आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेश राज्यात काँग्रेसचा पाया मजबूत करण्यासाठी प्रियंका गांधी प्रयत्नशील राहतील, असे सुत्रांनी सांगितले. शहरातील गोखले मार्ग येथील बंगल्यात त्या राहायला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बंगला खाली करायला लावून भाजपने राजकीय सुड उगवल्याचा आऱोप काँग्रेस केला.
उत्तरप्रदेशातील बंगला काँग्रेसच्या माजी नेत्या आणि इंदिरा गांधीच्या काकू शैला कौल यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे अनेक जण लखनऊला येण्याचा निर्णयाला इंदिरा गांधी यांच्याशी जोडत आहे. मोदी आणि योगी विरोधातील काँग्रेसचा लढा सुरुच राहील. इंदिरा गांधींनाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कठीण काळातून जावे लागले होते. प्रियंका गांधी राहायला जाणाऱ्या घराला ऐतिहासिक महत्त्व आहे. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी या ठिकाणी एक झाड लावल्याची आठवण आहे, असे काँग्रेस सुत्रांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील प्रियंका गांधींच्या कामाने आता सरकारची चिंता वाढली आहे. लोकांच्या हितासाठीचे विषय त्या मांडत राहतील. बंगल्यामधून बाहेर काढल्याने गांधी लोकांच्या हृद्यातून जाणार नाहीत. प्रियंका गांधी लोकांच्या मनामध्ये राहतात, असे उत्तरप्रदेश काँग्रेस प्रमुख अजय कुमार लालू म्हणाले.