नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या एका तरुण वकिलाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याला 'दीड कोटी रुपयांची ऑफर' केल्याचा धक्कादायक दावा केला आहे. उत्सव बैन्स असे या वकिलाचे नाव आहे. याने एका अज्ञात व्यक्तीने आपल्या कार्यालयात येऊन आपल्याला ही 'ऑफर' दिल्याचा दावा केला आहे. याविषयी त्याने सविस्तरपणे त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या महिलेने याचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) तयार करून सादर केले आहे. यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी अत्यंत भावनिकपणे आपल्याला निष्कारण या प्रकरणात गोवले जात असल्याचे म्हटले होते. तसेच, प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित करताना भान राखावे, असे आवाहनही केले होते. त्यांनी या आरोपांचे खंडन करत हे आपल्याविरोधातील अत्यंत घाणेरडे कारस्थान असल्याचेही म्हटले होते. इतक्या खालच्या पातळीच्या आरोपांविषयी बोलणार नसल्याचे सांगत 'न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे'ही ते म्हणाले होते.