नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवण्यात आला आहे. तर पीडितेच्या कुटुंबीयांनी किंवा आरोपींनी चौकशीला घाबरू नये, असे आरोपींचे वकील ए.पी. सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी राजकारण करत असलेल्यांनीही चिंता करू नये. सीबीआय चौकशीमधून सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
'हाथरस प्रकरणात सीबीआय चौकशीमधून सत्य बाहेर येईल' - हाथरस प्रकरण अपडेट
पीडितेच्या कुटुंबीयांनी किंवा आरोपींनी चौकशीला घाबरू नये, असे आरोपींचे वकील ए.पी.सिंह यांनी म्हटलं आहे. लवकरच संपूर्ण सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.
पीडित आणि आरोपी हे दोन्ही एकाच गावचे आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे, याबाबत सर्वांनाच माहिती होते. तरीही त्याला कारागृहात टाकण्यात आले. त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात येईल. तसेच त्याचे नावही सर्व ठिकाणावरून हटवण्यात येणार आहे, ए.पी.सिंह यांनी सांगितले.
न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास असणे आवश्यक आहे. देशातील सर्वात उच्च तपासयंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहे. ती लवकरच संपूर्ण सत्य बाहेर काढेल. सीबीआय आणि न्यायालयीन यंत्रणेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. अन्य पक्षांनी आणि त्यांच्या समर्थकांनीही न्यायालयीन प्रक्रियेवर आणि सीबीआयवर विश्वास ठेवायला हवा, असे अधिवक्ता ए.पी सिंह म्हणाले.