नवी दिल्ली - नौदलाचे प्रमुख म्हणून करमबीर सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. माजी नौदलप्रमुख सुनिल लांबा यांनी करमबीर सिंह यांच्याकडे आपला पदभार सोपवला. मात्र, सेवाजेष्ठता नियम न पाळता ही नियुक्ती झाल्याचे म्हणत अंदमान व निकोबार कमांडचे कमांडर इन चिफ, व्हाइस अॅडमिरल बिमल वर्मा यांनी लष्करी लवादात या नियुक्तीला अव्हान दिले आहे.
मागिल एनडीए सरकारच्या कार्यकाळात २३ मार्च रोजी करमबीर सिंग यांच्या नियुक्तीस मंजूरी देण्यात आली होती. करमबीर सिंग यांनी ३६ वर्षे नौदलात सेवा बजावली असून ते खडकवासला येथील एनडीए अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. यापूर्वी त्यांनी नौदल मुख्यालयात जाँइंट डायरेक्टर ऑफ नेव्ही तसेच मुंबईतील नौदलाच्या स्टेशन ऑफिसरपदी काम केले आहे. फ्लीट ऑपरेशन ऑफिसर म्हणून त्यांनी नौदलच्या पश्चिम तटाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.