नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या बॉईज लॉकर रुम या गंभीर प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी या ग्रुपच्या अॅडमिनला अटक केली आहे. याआधीही एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून, आणखी २२ जणांची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
'बॉईज लॉकर रुम'चा अॅडमिन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात.. सोमवारीच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सायबर सेलने आणखी काही विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन या ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे. यासोबतच या ग्रुपमधील बाकी सदस्यांचा शोधही सुरू आहे. पोलिसांनी यासाठी इन्स्टाग्रामलाही मदत मागितली आहे.
काय आहे 'बॉईज लॉकर रुम' प्रकरण?
दिल्लीतील काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर 'बॉईज लॉकर रुम' नावाने एक अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटच्या ग्रुप चॅटमध्ये आणखीही बरेच लोक अॅड झाले होते, ज्यांमध्ये शाळकरी मुले आणि तरुणांचे प्रमाण जास्त होते. या ग्रुप चॅटमध्ये ही मुले इन्स्टाग्रामवरील इतर मुलींचे फोटो शेअर करत, आणि त्यांच्यावर असभ्य टिप्पणी करत. तसेच कित्येक अल्पवयीन मुलींची छायाचित्रेही या ग्रुपमध्ये शेअर होत, ज्यावर ही मुले चवीने अश्लील टिप्पण्या करत. कहर म्हणजे, या मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार कसा करता येईल याबाबतही ही मुले चर्चा करत.
या चॅटरुममधील संभाषणांचे स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला, आणि संपूर्ण सोशल मीडिया हादरुन गेला होता. दक्षिण दिल्लीमधील एका तरुणीने या चॅट्सचे स्क्रीनशॉट लीक केले होते. "इन्साग्रामवर १७-१८ वर्षाच्या काही मुलांनी 'बॉईज लॉकर रुम' नावाने ग्रुप सुरू केला आहे. यामध्ये ते लहान-मोठ्या मुलींचे एडिट केलेले फोटो शेअर करतात. या ग्रुपमध्ये माझ्या शाळेतील दोन मुलेही आहेत, आणि आता मला आणि माझ्या मैत्रिणींना खूप भीती वाटत आहे. या सर्व प्रकारामुळे आता माझी आई मला इन्स्टाग्राम सोड म्हणत आहे" अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने हे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते.
हेही वाचा : 'बॉईज लॉकर रूम' प्रकरण : हरियाणातील एका शाळकरी मुलाने केली आत्महत्या..