नवी दिल्ली -'राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी' (एनआरसी) या मुद्यावरून काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर टीका केली आहे. मोदी आणि अमित शाह ही दोघे स्वत: घुसखोर आहेत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दोघेही घुसखोर आहेत. त्यांचे घर गुजरातमध्ये असून त्यांनी दिल्लीमध्ये घुसखोरी केली आहे, अशी टीका चौधरी यांनी केली आहे.
भारत हा सर्वांसाठी असून कोणाची मालमत्ता नाही. देशामध्ये राहण्याचा सर्वांना समान हक्क आहे. कोणत्याही व्यक्तीचा अधिकार हिसकावून घेण्याचा तुम्हाला हक्क नाही. हा आमचा देश असून आम्ही येथे मतदान करतो. त्यामुळे आम्हाला कागदपत्रे जमा करण्याची काय गरज आहे. एनआरसीमुळे देशातील लोक घाबरलेले आहेत, असेही चौधरी म्हणाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआरसी देशभरात लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून विरोधकांकडून शाह यांच्यावर टीका करण्यात येत आहे.