नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून केंद्रीय कृषी कायद्यांवर पुन्हा एकदा वक्तव्य केले. महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन त्यांनी कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. मात्र, पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी दिल्लीत या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. विरोधी पक्षाने कृषी कायद्यांना 'काळे कायदे' असे संबोधले आहे.
काय म्हणाले मोदी ?
मन की बात कार्यक्रमाचा आजचा 71 वा भाग होता. कृषी कायद्यांची योग्य आणि संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यास हे कायदे त्यांची ताकद बनेल, असे मोदी म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी जितेंद्र भोई यांचे उदाहरण देत त्यांनी नव्या कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं दिले उदाहरण
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जितेंद्र भोई या शेतकऱ्यांने मक्याची लागवड केली. ते योग्य किंमतीला व्यापाऱयाकडे विकण्याचे त्यांनी ठरविले. 3 लाख 32 हजार रुपये देय रक्कम निश्चित करण्यात आली. त्याला 25 हजार रुपये त्यांना अॅडव्हान्स मिळाले. उर्वरित पैसे 15 दिवसात देण्याचे ठरले. मात्र. उर्वरित पैसे त्यांना मिळाले नाही. नवा कृषी कायद्यानुसार पीक विकल्यानंतर तीन दिवसांच्या आत पीकाचे पैसे शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे. रक्कम मिळाली नाही. तर शेतकरी तक्रार देऊ शकतो. याचप्रकारे जिंतेद्र यांनी तक्रार केली आणि काही दिवसातच त्यांना थकबाकीची रक्कम मिळाली, असे मोदींनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या झाल्या
गेल्या काही दिवसांत झालेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या संधी मिळत आहेत. चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजूरी दिली. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावरची बंधने केवळ रद्दच होणार नाहीत, तर त्यांना नवे अधिकार, नव्या संधी मिळाल्या. यामुळे अल्पावधीतच, शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले, असे मोदींनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत मी आयआयटी गुवाहाटी, दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, गांधी नगरचे पेट्रोलियम विद्यापीठ, म्हैसूर विद्यापीठ आणि लखनऊ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. देशातल्या युवा पिढीबरोबर संवाद साधून मी ताजातवाना झालो, हा अनुभव ऊर्जा देणार होता. विद्यापीठाचा परिसर म्हणजे मीनी इंडियाच असतो, तिथे भारताच्या विविधतेचे दर्शन होते आणि नवभारतासाठी मोठ परिवर्तन घडवून आणण्याचे इच्छाशक्ती दिसते, असे मोदी म्हणाले.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहीब कॉरिडॉर सुरू करणे ही ऐतिहासिक घटना होती. ही आठवण मी आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहे. आपल्या सर्वांचे भाग्य थोर आहे, म्हणून श्री गुरुनानक साहीब यांची सेवा करण्याची एक संधी मिळाली, असे मोदी म्हणाले.