श्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेतील तीन शिक्षकांवर पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा अधिनियमांतर्गत (पीएसए) गुन्हा दाखल केला आहे. या शाळेतील काही विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळले होते. यानंतर येथील शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा महामार्गावरील सैन्याच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता. हल्ला करणारा सज्जाद भट या धार्मिक शाळेचा माजी विद्यार्थी होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले.
आयजीपी (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी ही शाळा बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंधित असल्याचे पत्रकारांना सांगितले. 'आम्ही या शाळेच्या तीन शिक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, सिराज-उलूम इमाम साहिब असे या शाळेचे नाव आहे. पीएसए अंतर्गत अब्दुल अहद भट, मुहम्मद युसुफ वणी आणि रऊफ भट या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे,' असे ते सोमवारी म्हणाले.
हेही वाचा -'पाकिस्तानमध्ये 828 हिंदू मंदिरांपैकी शिल्लक राहिलीत केवळ 20 मंदिरे'