जबलपूर - मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने आत्महत्या केल्याप्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. जबलपूरचे पोलीस महानिरीक्षक भगवंत सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 25 वर्षीय शुभम बैरागी हा पोलीस कोठडीत होता. बैरागी शस्त्र तस्करीत सहभागी असल्याचे चौकशीत उघड झाले होते, असेही चौहान यांनी सांगितले. त्याची माहिती देणाऱ्यास 3 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
शस्त्र लपवलेल्या एका पडक्या घरात पोलीस बैरागी याला चौकशीसाठी घेऊन गेले होते. तेथे लपवलेली बंदूक घेऊन बैरागी याने स्वतःवर गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर बैरागीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आला असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
शुभम बैरागीची बहीण सोनम हिने पोलिसांनीच शुभमचा खून केला असल्याचा आरोप केला. त्याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर खुनाचा खटला नोंदवला जावा, अशी मागणी तिने केली. भटांलिया भागात शुभम बैरागीचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.