जयपूर - देशाला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, कारण कोणत्याही लोकशाहीचे मूळ हा विरोधी पक्ष असतो. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी असे मत व्यक्त केले. ते जयपूर साहित्य संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेपासून राजकीय मुद्द्यांवरही चर्चा केली. ते म्हणाले, की मागील दोन महिन्यांपासून अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत, मात्र हा बदल कधीपर्यंत टिकेल हे सांगता येत नाही.
बॅनर्जी म्हणाले, की आपला देश आर्थिक मंदीच्या गर्तेतून बाहेर येईल, मात्र त्याला आणखी काही वेळ लागेल. आपल्याकडे सध्या तरी एवढ्या प्रमाणात पैसे उपलब्ध नाहीत, की ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. त्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. विदेशी गुंतवणुकादारांचे प्रमाणही कमी होत चालले आहे, यावर सरकारने विचार करणे आवश्यक आहे. कारण, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची आवश्यकता असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज..