नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय, संजय सिंह, जास्मीन शाह आणि डॉ. अजोय कुमार आदी उपस्थित होते.
जानेवारीमध्ये आपने 'केजरीवाल का गॅरंटी कार्ड' प्रसिद्ध केले होते. यामध्ये दिल्लीकरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोहल्ला मार्शल आणि २४ तास स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिल्लीकरांना २०,००० लिटर मोफत पाणी आणि पुढील पाच वर्षांपर्यंत २४ तास स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन आपनेदिले.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी याअगोदरच आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. ३१ जानेवारीला भाजपने आपले 'संकल्प पत्र' जाहीर केले होते. तर, २ फेब्रुवारीला काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. भाजपने आपल्या संकल्प पत्रामध्ये गरीबांना २ रूपये प्रति किलो दराने पीठ, तर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे तसेच सत्तेमध्ये आल्यानंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.