नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. दिल्लीतील हवेने सर्वसामान्यांचा श्वास घुसमटू लागला आहे. यासाठी भाजप आप सरकारला जबाबदार धरत आहे. तर, 'आप'ने यासाठी भाजपवर हल्ला चढवला आहे. शुक्रवारी माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना 'आप'ने धारेवर धरले आहे.
'आपच्या आमदाराचे ट्वीट'
जंगपुरा येथील आपचे आमदार प्रवीण कुमार यांनी ट्वीट करत गौतम गंभीर गायब असल्याची पोस्टर्स भिंतीवर लागली असल्याचे म्हटले आहे. जनता प्रदूषणाने त्रासली आहे. मात्र, आमचे खासदार 'गंभीरता' सोडून देऊन इंदूरमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री करत आहेत. आपच्या आमदाराच्या या ट्वीटला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.
वाढत्या प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली होती. यामध्ये अनेक खासदार अनुपस्थित राहिले. यामध्ये पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांचाही समावेश आहे. यावरून आम आदमी पक्षाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. सोशल मीडियावर गंभीर यांना ट्रोल केले जात आहे.