पणजी- लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षातर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातून गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स, तर उत्तर गोव्यातून सरचिटणीस प्रदीप पाटगावकर हे निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याची माहिती गोम्स यांनी दिली.
आप पक्षाने गोवा विधासभेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक लढविली होती. तर आता लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल याकडे लोकांचे लक्ष होते. परंतु, निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच काही काळ उमेदवारी जाहीर करून विविध भागांत प्रचाराला सुरुवात केली होती.
गोम्स म्हणाले, आता जेव्हा आम्ही ग्रामीण भागात प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घडविलेले बदल येथील लोकांना अपेक्षित आहेत. तर लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, नेते मनिष सिसोदिया, संजय सिंह गोव्यात येणार आहे.