अमृतसर - ड्रग्जच्या विळख्यातून मुलीला सोडवण्यासाठी पालकांनी तिला साखळीने बांधल्याची घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली. अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह औजला यांनी त्या मुलीची भेट घेतली. तिची स्थिती पाहून मी काही क्षण स्तब्ध झालो, ही दुर्दैवी घटना आहे. मी डॉक्टरांना या मुलीच्या घरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गुरजीत सिंह यांनी सांगितले.
धक्कादायक! ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी पालकांनी मुलीला बांधले साखळीने
ड्रग्जच्या विळख्यातून मुलीला सोडवण्यासाठी पालकांनी तिला चक्क साखळीने बांधल्याची घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे.
ड्रग्जच्या आहारी गेलेली तरुणी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. काही वैयक्तिक कारणामुळे ती तणावामध्ये होती. त्यावेळी तिच्या काही ग्राहकांनी तिला तणावमुक्त होण्यासाठी ड्रग्ज घे असे सांगितले. त्यानंतर तीने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. याचे तिला व्यसन लागल्याची माहिती तीने गुरजीत यांना दिली. तिची ही सवय मोडण्यासाठी आम्ही त्याला साखळीने बांधून ठेवल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
पंजाबमध्ये अमली पदार्थाचे सेवन ही गंभीर समस्या आहे. जगभरातील देश अमली पदार्थाच्या प्रश्नाशी झुंजण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अमली पदार्थ पसरण्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण आणि राजकारण आहे. मुळात अमली पदार्थ येतात कुठून, त्याचा पुरवठा कोण करते, यामागचे राजकारण आणि अर्थकारण काय, यावर उपाय काय, अशा सर्व बाजूंनी हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो.