इंदौर -मध्यप्रदेशमध्ये एका रुग्णालयात डोळ्यावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल 11 रुग्णांची दृष्टी गेली आहे. या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
इंदूरच्या नेत्र रुग्णालयात 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर भरवण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या डोळ्यात जे औषध टाकण्यात आले, त्याचा संसर्ग झाल्याने रुग्णांच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे.
ही घटना खुपच दु:खद असून याप्रकरणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याचबरोबर बाधित रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात योग्य उपचार आणि 50 हजारांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टि्वट करून म्हटले आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी इंदौर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीमार्फत केली जाणार आहे. ज्यामध्ये इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
2010 मध्ये याच रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 20 जणांची दृष्टी गेली होती. यानंतर पुन्हा या रुग्णालयाने शिबिर भरवले आणि यावेळी देखील संसर्गामुळे रुग्णांची दृष्टी गेली आहे. शस्त्रक्रियेनंतर हळूहळू डोळ्याची दृष्टी कमी झाली असून यावर डॉक्टर काहीच बोलत नसल्याचं रुग्णांनी सांगितले आहे.