नवी दिल्ली - स्पेशल फ्रंटियर फोर्सेस (एसएफएफ) किंवा ‘एस्टॅब्लिशमेंट-22’ हे भारतातील सर्वांत चांगले रहस्य आहे. पण एसएफएफवरील गुप्ततेचा पडदा हळूहळू उचलला जात आहे. याला कारण आहे, चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी - अॅक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल) ऑगस्ट 29-30 दरम्यान झालेल्या एका विशेष कारवाईतील एका एसएफएफ अधिकाऱ्याच्या मृत्यूचे.
चिनी सीमेजवळ विशेष कमांडो ऑपरेशन्स घडवून आणण्यासाठी 1962 मध्ये एसएसएफची स्थापना करण्यात आली. उत्तराखंडमधील चक्रता येथे एसएफएफचे मुख्यालय आहे. उंच भूभागावरील युद्धातील तज्ज्ञ कमांडोंचे दल म्हणून याची ओळख आहे. याचा भारताच्या अनेक सैन्य आणि अंतर्गत सुरक्षा संघर्षांमध्ये सक्रिय सहभाग होता. अनेक 'टॉप सीक्रेट ऑपरेशन्स' त्यांनी बिनबोभाट पार पाडली आहेत. परंतु, त्यांचे कार्य लोकांच्या नजरेतून आतापर्यंत सुटले आहे.
अशाच प्रकारची महत्त्वाकांक्षी कारवाई सीआयएला सोबत घेऊन करण्यात आली. यामध्ये कांचनजंगाच्या नंतर भारतातील दुसर्या क्रमांकाची उंची असलेल्या नंदादेवी शिखरावर 7 हजार 816 मीटर उंचावरील ठिकाणी मॉनिटरिंग डिव्हाइस लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
1964 मध्ये चीनने झिनजियांग प्रांतात अणुबॉम्बचा चाचणी-स्फोट करून पाश्चिमात्य जगताला आश्चर्यचकित करून सोडले होते. तोपर्यंत पाश्चिमात्य देशांना चीन अणु तंत्रज्ञान मिळवण्यापासून फार दूर आहे, असा विश्वास होता. यानंतर चीनकडून आणखी काही आण्विक चाचण्या केल्या जातात का, हे शोधून काढण्यासाठी सीआयएच्या प्रेरणेतून आलेली नंदादेवी शिखराजवळ मॉनिटरिंग डिव्हाइस (एखादे उपकरण शोधून काढणारे यंत्र) लावण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर इंटेलिजेंस ब्युरोने (आयबी) (एसएफएफने या संस्थेच्या अंतर्गत कार्य करत होती) दिग्गज पर्वतारोही कॅप्टन एम एस कोहली यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले.
हेही वाचा -केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या आईचे निधन ; एम्समध्ये केलं नेत्रदान
'मी आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) मध्ये होतो. मात्र, माझ्या सेवांचा वापर आयबीसह इतर समकक्ष संघटनांकडूनही केला जात होता,' असे कॅप्टन कोहली यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. सध्या 89 वर्षांचे आहेत.
'आमचे पथक खूप मोठे होते. त्यात अमेरिकन लोकांचाही समावेश होता. पण मुख्य नेते म्हणजे मी, सोनम ग्यात्सो, हरीश रावत, जीएस पांगू, सोनम वांग्याळ असे होतो. बरेच लोक एसएफएफ किंवा एस्टॅब्लिशमेंट -22 मधील नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील होते.' पथकातील बर्याच सदस्यांना अलास्काच्या माउंट मॅककिन्ली येथे सीआयए सुविधात प्रशिक्षण देण्यात आले होते.