चंदिगड- तळहातावर पोट असणाऱ्यांसाठी लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दररोज सकाळी कामावर जाऊन संध्याकाळपर्यंत थोडेफार पैसे कमावून आणल्याने त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आणि त्यांच्यासमोर दोनवेळच्या अन्नाचे संकट उभे राहिले. चंदीगड येथील समाजसेविका पुजा बक्शी अशा लोकांसाठी देव बनून आल्या आहेत. पुजा यांनी संचारबंदीच्या काळात अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
संस्थेकडून गरीब परिवारांची मदत -
लॉकडाऊनमुळे गरीब लोकांना अन्न भेटणे कठीण झाले होते. सरकारकडून गरिबांना जेवण पोहोचवले जात होते. मात्र, तरीही असे लोक होते ज्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत नव्हते. अन्न पोहचलं तर इतर गोष्टी खरेदी करायला पैसै हवे होते. अशा परिवारातील महिलांना आम्ही एनजीओच्या माध्यमातून संपर्क केला आणि त्यांना घरीच मास्क बनवण्याचे काम दिले, असे 'वुमन अँड चाईल्ड वेलफेअर सोसायटी'च्या संचालिका पुजा बक्शी यांनी सांगितले.