नवी दिल्ली -दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरु आहे. सत्तारुढ 'आप'ला रोखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर सत्ता कायम राखण्यासाठी आपचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. केजरीवाल यांचा प्रचार करण्यासाठी अहमदाबादच्या एका युवकाने आम आदमी पक्षाच्या मुख्यालयासमोर चहाचा स्टॉल सुरू केला असून तो लोकांना विनामूल्य चहा देत आहे.
दिल्ली निवडणूक: विनामूल्य चहा देऊन गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार
प्रफुल्ल बिल्लोर असे चहाचा स्टॉल सुरू करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रफुल्ल बिल्लोर हा तरुण 'एमबीए चहावाला' या नावाने प्रसिद्ध असून प्रफुल्ल हा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे.
शिक्षण, रस्ता, सुरक्षा अशा अनेक क्षेत्रामध्ये केजरीवाल यांनी काम केले आहे. त्यांच्या कामांपासून मी प्रभावित झालो. या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे लोकांना सांगण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रफुल्ल बिल्लोर याने सांगितले. दरम्यान चहाच्या स्टॉलचे उद्घाटन आपचे खासदार संजय सिंह यांनी केले.
दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी 2020मध्ये निवडणूका होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे देशाच्या राजधानीतील राजकीय परिस्थितीला रंजक वळण लागले आहे.
सध्या हा सामना मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येते. भाजप सध्या दिल्ली आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेत आहे. अशा वातावरणात, केजरीवाल सरकारने शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी, वाहतूक आणि महिला सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये राबविलेल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळत आहे. तर विविध राज्यांमध्ये लोकप्रियता डळमळीत होत असताना दिल्लीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून कोणती रणनीती आखली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.